मुख्य सामग्रीवर वगळा

कानाचे कित्ते कुठे मिळतात?

仮名 चे कित्ते (प्रॅक्टिस् वर्कशीट्स्) वेगवेगळ्या संकेतस्थळांवर (वेबसाईट्स्) मिळतात. त्यापैकी काहींची माहिती खालीलप्रमाणे आहे:
०१) एन्. एच्. के. इझी जॅपनीज्- निहोङ्गोची तोंडओळख करू पाहणार्‍यांसाठी हे उत्तम संकेतस्थळ आहे. ह्यावर कानांच्या कित्त्यासोबत कानांची वळणं (स्ट्रोक्स्) दाखवणारी चलचित्रं (व्हिडिओज्) मिळतात. ह्यावर निहोङोच्या तोंडओळखीसाठीचं पाहूऐकूसे (ऑडिओ-व्हिज्युअल्) अभ्याससाहित्य मिळेल. तुम्ही कित्ता उतरवल्यानंतरही (डाऊनलोड् केल्यानंतरही) ह्यावर थोडं भटका नि त्यावरचं अभ्याससाहित्य पाहिल्यावाचल्यावाचून संकेतस्थळावरून निघू नका.

०२) जपनीज लेसन्स्- ह्यात हिरागाना, काताकानाला टिपल्यानंतर (क्लिक केल्यानंतर) त्याचं पान उघडेल, ज्याच्या शेवटी पी. डी. एफ्. चे जाळदुवे (हाइपरलिंक्स्) दिल्याहेत. बर्‍याचदा त्या शेवटी असल्याने शोधाशोध पुरते, म्हणून आधीच सांगून ठेवलं. मला हा निहोङ्गोचा कित्ता आवडतो, कारण तो युटिलिटेरिअन नि मिनिमालिस्ट प्रकारचा आहे.

मी हा कित्ता उतरवला होता. मी कित्त्याला वळणं कळण्यापुरता उतरवला होता, त्याला सत्यप्रतला (झेरॉक्स केला) नाही. कारण, मी काना वळणं गिरवायला चौकटींची वही क्रयली (खरेदी केली) होती. क्लासमेटची लहान पोरांना अङ्क, बेरीज वजाबाकी शिकण्यासाठी क्रयतात, ती पातळ पुठ्ठ्याची चौकटींची वही मी क्रयली होती. हीत ११ मीमी. x ११ मीमी. आकाराचे समासाचे सोडून आडवे ११ नि उभे १६ रकाने आहेत. समासात आडवे २ नि उभे १६ रकाने गेलेत. तरीही, कानातल्या सगळ्या बाराखड्या (सिलॅबल्स्) मावतील इतके रकाने समास वगळून उरतात. काना नि काङ्जीच्या अभ्यासाला ही चौकटीची वही उत्तम आहे.

तुम्हीही केवळ वळणं कळण्यापुरता कित्त्ता उतरवणार असाल, तर जॅपनीज् लेसन्स् पेक्षा एन्. एच्. के. च्या संकेतस्थळावर जा. तिथे वळणांची चलचित्रं आहेत. ती तुम्हाला ह्यावरच्या कित्त्यांची निकड भासू देणार नाहीत.

 ०३) डॉक्टर् मोकु- हा मायाबाईंनी (मॅडमांनी) दिला होता. हाही जॅपनीज लेसन्ससारखाच युटिलिटेरिअन नि मिनिमालिस्ट आहे.

आधी सगळे कित्ते पाहा. त्यातला जो आवडेल तो उतरवा. मी दिले, त्यापलीकडेही अनेक संकेतस्थळं कित्ते पुरवतात. तुम्हाला त्यांचे आवडल्यास ते उतरवा. मी आशा बाळगतो की, माझी माहिती तुम्हाला उपयोगी पडेल.